जिल्हा इस्पितळाचे रूपांतर कोविड इस्पितळात

विश्वजीत राणे यांच्याकडून पाहणी : द‌क्षिण गोव्यातील रुग्णांसाठी सोय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September 2020, 12:12 am

मडगाव : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या पाहणीनंतर शनिवार सायंकाळपासून इएसआय इस्पितळातील स्थिर प्रकृती असलेल्या कोविडबाधितांना जिल्हा इस्पितळात हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांनाही पुढील आठवड्यापर्यंत कोविड किट देण्यात येणार आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे रूपांतर कोविड इस्पितळात करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी सायंकाळी करोनाबाधितांसाठीच्या उभारण्यात आलेल्या जिल्हा इस्पितळातील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर, डॉ. राजेश पाटील, डॉ. सुनंदा आमोणकर, उदय काकोडकर, दीपा कुरैया, विश्वजीत फळदेसाई उपस्थित होते.
इस्पितळाच्या पाहणीअंती प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले की, जिल्हा इस्पितळात शनिवारपासून कोविडबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. सध्या दीडशे रुग्णांसाठीची सोय करण्यात आलेली आहे. यात ७५ महिला व ७५ पुरुष अशी सोय केलेली आहे. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल. अजूनही इस्पितळातील काही कामे होणे बाकी आहे. मात्र, कोविडबाधितांवर उपचारासाठी आवश्यक मशिन, व्हेंटिलेटर व इतर सुविधा इस्पितळात उपलब्ध केलेल्या आहेत. यानंतर इस्पितळात आयटीयू, एचडीयू या कक्षांची स्थापनाही केली जाईल. यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळेल. राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतच राहणार आहे. मात्र, रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आरोग्य खात्यासह आपणही प्रयत्नशील आहोत, असे राणे म्हणाले.
कोविडबाधितांवर उपचारादरम्यान रुग्णालयासाठी एसओपी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार नातेवाईकांना रुग्णांना भेटण्यास बंदी असेल तसेच अटेंडंट ठेवणेही आवश्यक असणार आहे. सध्या दिवशी रुग्णांवर उपचार करण्याकरिता परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी स्पष्ट केले. हे कर्मचारी परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करतील, असेही ते म्हणाले.
जिल्हा इस्पितळात नोडल अधिकारी म्हणून डॉ. राजेश पाटील व डॉ. सुनंदा आमोणकर या काम पाहणार आहेत. इस्पितळाची सुरुवात करण्यात येत असतानाच वैद्यकीय अधिकारी व परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोलवा येथील कोलवा रेसिडेन्सी व हॉटेल विलियम्स याठिकाणी कर्मचार्‍यांच्या राहण्याची सोय करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
रुग्णांनी वेळेत संपर्क साधल्यास उपचार करणे सोपे : बांदेकर
डीन बांदेकर यांनी सांगितले की, करोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतरही अनेक नागरिक रुग्णालयात येण्यास टाळाटाळ करतात. त्यांनी वेळेत संपर्क साधल्यास उपचार करणे सोपे जाणार आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या कोविड किटमध्ये प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोमॉर्बिड अवस्थेतील होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी ही पाच दिवसांची औषधे घेतल्यास त्यांना निमोनिया होण्यापासून रोखता येते. उत्तर प्रदेश व बांगलादेशमध्ये याबाबत अभ्यास करण्यात आलेला आहे. त्या धर्तीवर या औषधांचा समावेश किटमध्ये करण्यात आलेला आहे.
डॉ. सुनंदा आमोणकर यांनी सांगितले की, आरोग्य संचालनालय व गोमेकॉच्या सहकार्यातून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या ईएसआयमधील ज्या रुग्णांची तब्बेत स्थिर आहे अशा रुग्णांनाच जिल्हा इस्पितळात हलविण्यात येणार आहे. एखाद्या रुग्णाची तब्येत पुन्हा बिघडल्यास त्याला गोमेकॉ किंवा एसआय इस्पितळात पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
होम क्वारंटाइनमधील रुग्णांना लवकरच कीट
होम क्वारंटाइन असलेल्या करोनाबाधितांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कोविड कीटबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच किटचे वाटप सुरू करण्यात येईल, असे विश्वजीत राणे यांनी सांगितले. तर डीन बांदेकर यांनी पुढील आठवड्यापासून किट देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी देण्यात येणाऱ्या उपकरणांमार्फत त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येईल. जो डेटा प्राप्त होणार आहे त्याचे डिजिटलायझेशन ही करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.