आठ मृत्यू, ५९६ नवे बाधित

- श्वसनाच्या त्रासासोबत करोनाची भीतीही ठरतेय कारण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th September 2020, 02:13 am
आठ मृत्यू, ५९६ नवे बाधित

पणजी : राज्यात कोविड-१९च्या बळींचे शुल्ककाष्ट सुरूच आहे. शुक्रवारी आठ मृत्यूंची नोंद झाली. एक २८ वर्षीय तरुणी तर दोन ३० वर्षीय तरुणांचा त्यात समावेश आहे. अधिकतर मृत्यू हे श्वास घेण्यास त्रास होणे आणि कोविड-१९च्या भीतीमुळे होत असल्याचेही अहवालावरून स्पष्ट होत आहे. 

 शुक्रवारी ५९६ नव्या करोनाबाधितांची भर पडल्याने राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ५,७३०वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा २७,३२९ वर पोहचला असून त्यातील २१,३१४ जण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या ३३५वर पोहोचली आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ७७.८४ टक्के आहे. शुक्रवारी ४७० जण बरे झाल्याची नोंद आहे. एकूण ११,१६९ करोनाबाधितांनी घरीच विलगीकरणाचा पर्याय निवडला आहे.

खाजगी इस्पितळांच्या दरांचा होणार फेरविचार 

राज्य सरकारने खाजगी इस्पितळांसाठी निश्चित केलेल्या उपचार दरांचा नव्याने फेरविचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. या संबंधीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलेली आहे. सरकारने स्थापन केलेल्या सल्लागार समितीने या दरांत फेरबदल करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीच्या अनुषंगाने फेरविचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

द. गोवा जिल्हा इस्पितळ आजपासून रुग्णसेवेत 

कोविड-१९ रुग्णांवर उपचारांसाठी शनिवारपासून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात १५० खाटांची सोय करण्यात आली आहे. हे इस्पितळ तत्काळ सुरू केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. या इस्पितळाची क्षमता ३५० खाटांपर्यंत नेण्याची तयारी सरकारने केली आहे. या इस्पितळामुळे कोविड-१९ रुग्णांना खाटांची कमतरता भासणार नाही.

हेही वाचा