प्रश्न, अडचणी, समस्यांचा सरकारसमोर डोंगर

प्रतिनिधी । गोवन वार्ता


19th September 2020, 02:11 am
प्रश्न, अडचणी, समस्यांचा सरकारसमोर डोंगर

पणजी : करोनावर मात करत अठरा दिवसानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली. त्यांनी एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती आणि त्यासंबंधी उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. प्रश्न, अडचणी, समस्यांचा सरकारवर भडिमार सुरू झाला आहे. मंत्री, आमदारांकडून लोकांचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत असून, परिणामी त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडला आहे.

 शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांच्या भेटी घेण्याचे काम सुरू केले. ते करोनाबाधित झाल्यामुळे त्यांनी पणजी-आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावरच विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला होता. करोनाबाधित होऊनही घरी ते सरकारी काम करीत होते. ऑनलाईन पद्धतीने बैठका घेऊन अधिकार्‍यांना निर्देश देत होते. राज्यासमोरील बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करणे हे सर्वांत मोठे प्राधान्य असल्याने त्यांनी वित्त खात्याच्या अधिकार्‍यांची महत्वाची बैठक घेतली. तयार केलेल्या कृती आराखड्यावर चर्चा झाली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. आर्थिक परिस्थितीशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीत ऊहापोह झाला.

राज्यात करोना महामारीमुळे अनेकांवर संकट ओढावले आहे. वेगवेगळे प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने लोकांकडून दबाव वाढत आहे. शुक्रवारच्या पहिल्याच भेटीत मुख्यमंत्र्यांना याचा अनुभव आला. मंत्री, आमदारांबरोबरच वेगवेगळ्या घटकांकडून आपले महत्वाचे प्रश्न, अडचणी, समस्यांचे पाढेच त्यांच्यासमोर सादर करण्यात आले. तरीही मुख्यमंत्र्यांनी शांतपणे हे एकून घेत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विविध खात्यांमधील महत्वाच्या कामांसंबंधीही या भेटीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

कर्ज हप्त्यांना आणखी सूट हवी : लोबो 

* पर्यटन उद्योगाशी संबंधीत घटकांना बँकांकडून वसुलीसाठी फोन येऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरबीआय गव्हर्नरला पत्र पाठवून कर्जांच्या हप्त्यांना आणखी दोन महिने सूट मिळवून द्यावी, अशी मागणी कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी केली. 

* शॅक्स मालकांना फक्त ५० टक्के शुल्क लागू करावे. तसेच त्यांना नोव्हेंबरपर्यंत शॅक्स उभारण्याची परवानगी द्यावी. त्यांचे परवाने रद्द केले जाऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले. 

* पर्यटन खात्याकडे नोंद केलेल्या हॉटेलांची दखल घेण्याची सक्ती ऑनलाईन सेवा देणार्‍यांना केल्याने उर्वरित उद्योग ठप्प झाला आहे. ही सक्ती रद्द करून त्यांना कोणत्याही हॉटेलला बुकिंग करण्याची मोकळीक द्यावी, अशी मागणीही मायकल लोबो यांनी केली. 

ऊस उत्पादकांनी घेतली भेट

ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यासोबत झालेल्या या भेटीत संजीवनी साखर कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. या शेतकर्‍यांचा विषय तत्काळ सोडविण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.