मोपाचे काम बंद ठेवा : महाले

- शेकडो कामगारांना करोनाची बाधा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th September 2020, 09:39 pm
मोपाचे काम बंद ठेवा : महाले

पेडणे : मोपा विमानतळ क्षेत्रात कार्यरत शेकडो कामगारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गुरुवारी एका दिवसात १०९ बाधितांची नोंद झाली. मोपा विमानतळ क्षेत्र हा करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळेच तेथील काम बंद ठेवावे, अशी मागणी मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी केली आहे. 

 याबाबत महाले यांनी म्हटले आहे की, सदर विमानतळावर किती कामगार आहेत, याची माहिती स्थानिक मोपा पंचायतीला नाही. केवळ मोपाचे नाव वापरले जाते. कामगार किती त्याची नोंद पंचायतीकडे नाही. कंपनीने सध्या विमानतळाचे काम बंद ठेवावे व करोना नियंत्रणात आल्यावर ते सुरू करावे. मोपा विमानतळावर कितीजण कामाला आहेत? त्यांचा आकडा आजपर्यंत मोपा पंचायतीकडे का आला नाही? सदर कामगार कोठून आणले जातात? ते कुठे राहतात? ते कुठे फिरतात, या संदर्भात नोंदी नसल्याने एका दिवसात शेकडो कामगारांना करोना संसर्ग झाला आहे. त्याबद्दल मोपा पंचायत मंडळानेही चिंता व्यक्त केली आहे. गावच्या सुरक्षेसाठी सध्या काम बंद करावे, अशी मागणी सुबोध महाले यांनी केली आहे.