सात्विक, तामसी, राजसी श्रद्धा आणि आत्मधन

मनु नावाच्या राजानं त्याच्या प्रजेनं पालन करण्यासाठी सामाजिक नियमांविषयी सखोल विवेचन करणारं जे पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव 'मनुस्मृति' असं आहे. आणि त्याच्याही हजारो वर्षं अगोदर ऋषी-मुनींना ध्यान-तपस्येत मानवी जीवनाविषयीची जी शाश्वत अशी मूलतत्वं स्फुरली त्या वेदशास्त्रांना श्रुति-स्मृति असं म्हणतात

Story: अवांतर । मिलिंद कारखानीस |
17th September 2020, 05:48 pm

अरे काय चाललंय हे तुझं ? - प्रमोद म्हणाला. प्राथमिक शाळेतला माझा वर्गमित्र. बरेच वर्षांनी त्याची माझी भेट होत होती. 

अरे वा! प्रमोद, ये. किती वर्षांनी भेट होत्येय आपली! कसं काय येणं केलंस?

काय चाललंय तुझं?

काही नाही रे. निवृत्तीनंतर काय करायचं? जॉब तर कुठे काही घेतलेला नाहिये. लिखाण करतो थोडं थोडं जमेल तसं! का? काय झालं?

तेच. तेच ते! तुझं लिखाण! तेच परवा वाचनांत आलं माझ्या! 

वा! मग? कसं काय वाटलं?

अरे काय लिहिता तुम्ही लोकं!! मनुस्मृती काय, वेद काय, श्रद्धा काय, आत्मधन काय, सत्वगुण काय, काय लावलंय काय हे?

अध्यात्मशास्त्रांतले शब्द आहेत ते! पण त्यांत मनुस्मृतिचा उल्लेख कुठंच नाहिये. आता श्रुतिस्मृतिला पण जर तू मनुस्मृतिच म्हणत असशील तर याचा अर्थ असा होतो की तुझं मन पूर्वग्रहदूषित आहे!

म्हणजे काय?

काय ते ?

ते पूर्ण गृह दूषित काय म्हणालास ते?

म्हणजे तुझं मन चुकीच्या समजूतींनी गढूळलेलं आहे!

ते कशावरून?

अरे स्मृति इराणी म्हणा किंवा श्रुतिस्मृति म्हणा, तुझ्यासारख्यांना फक्त मनुस्मृतीच दिसतं! पण श्रुतिस्मृति आणि मनुस्मृति यात जमीन अस्मानाचा फरक आहे!

काय फरक आहे?

काय फरक आहे?!! जवळजवळ तेहेतीसशे वर्षांपूर्वी आकाशांतल्या बापानं मोझेसला नीतिमत्तेचे दहा आदेश दगडावर लिहून दिले होते असं जे ख्रिस्ती जगत् मानतं, त्याच्या हजारो वर्षं अगोदर मनु नावाच्या राजानं त्याच्या प्रजेनं पालन करण्यासाठी सामाजिक नियमांविषयी सखोल विवेचन करणारं जे पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव 'मनुस्मृति' असं आहे. आणि त्याच्याही हजारो वर्षं अगोदर ऋषी-मुनींना ध्यान-तपस्येत मानवी जीवनाविषयीची जी शाश्वत अशी मूलतत्वं स्फुरली त्या वेदशास्त्रांना श्रुति-स्मृति असं म्हणतात.

तेच ते काय असेल ते!! पण ते श्रद्धा, अन् ते आत्मधन आणि ते सत्वगुण हे सगळं काय लफडं आहे? या असल्या किचकट शब्दांनी आमच्यासारखा माणूस पार गोंधळून जातो बघ! काही म्हणता काही कळत नाही! दुसऱ्या कुणाला विचारण्यापेक्षा म्हटलं तुलाच जाऊन विचारावं. बघुया काही कळतंय का!

अरे वा! उत्तम केलंस. मी सांगण्याचा प्रयत्न करतो. किती वेळ आहे तुझ्याकडे?

तासाभरांत परत या म्हणून बायकोनं सक्त ताकीद दिल्येय!

हो! पाळतोयसच कि नि अगदी सगळ्या आज्ञा बायकोच्या!

तेवढ्यांत आमच्या सौभाग्यवतींनी चहा आणला. आणि साखर वेगळी आणली!

हे बरं केलंत बघा वहिनी. आम्हाला साखर जरा कमीच लागते! डॉक्टरनी आजिबात साखर खाऊ नका म्हणून सांगितलंय, खरं आजिबात साखर नाही घातली तर ते एरंडेल पिल्यासारखं वाटतं होss!

प्रमोद, तुमचा कुळदेव कोणता रे?- चहा पिता पिता मी त्याला विचारलं.

रवळनाथ!

कुठं आहे त्याचं देऊळ?

माशेलांत.

मूळ तिथलाच तो?

नाही. चोडणांतला.

पिसो रवळू?

होय, होय ! तुला काय माहिती?

आमचाही तोच कुळदेव आहे अशी आमच्या काही नातेवाईकांची समजूत आहे!

असं? हे मला नव्हतं माहीत! संशोधन केलं पाहिजे!

हो. सगळ्यांचा कुळदेव एकच असतो का रे?

नाही. वेगवेगळे असतात.

कोणते कोणते?

पुष्कळ असतात. मंगेश, शांतादुर्गा, रामनाथ, महालसा नारायणी, विजयादुर्गा, गोमंतेश्वर, सांतेरी देवी, महालक्ष्मी, लईराई देवी, चंद्रेश्वर भूतनाथ, वगैरे वगैरे.

तुमचा कुळदेव यांच्यापैकी एखादा नसून रवळनाथच का?

का म्हणजे काय ? आम्ही त्यालाच कुळदेव मानतो.

हो, मान्य आहे, पण त्यालाच का मानतोस तू?

माझ्या आईवडिलांनी, काकाकाकींनी, आजीआजोबांनी सांगितलं म्हणून.

ठीक आहे. पण त्यांनी जे सांगितलंय तेच खरं कशावरून?

ते खरं सांगतायत् याची मला खात्री आहे.

कशावरून तू खात्री केलीस?

ते खोटं सांगणार नाहीत, खरंच सांगतील, यावर माझा व माझ्या बायकोचा आणि मुलांचाही पूर्ण विश्वास आहे.

होय ना! याच विश्वासाला श्रद्धा म्हणतात! घरांतल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं ऐकून त्या देवाला मनापासून कुळदेव मानून तुम्हाला जमेल तशी तुम्ही त्याची पूजा करता. पूजा करता म्हणजे काय करता रे तुम्ही?

काय करता म्हणजे? भटजी जे करतील तेच! देवळांत भटजीच करतात की पूजा! देवाच्या मूर्तीला आंघोळ घालतात. दुधानी, गरम पाण्यानी. मग स्वच्छ पुसून ती कोरडी करतात. त्याला गंध, हळद, कुंकू लावतात. फुलं वाहतात. धूप व दीप ओवाळतात. नैवेद्य दाखवतात. हीच पूजा. आम्ही आपलं आपापल्या परीनं फूल, फळं, दूध, पैसे असं जे काही शक्य असेल ते देवाला अर्पण करतो.

कोंबडं, बकरं कापता की नाही देवापुढे?

नाही बुवा. आम्ही आसलं काही बळी बिळी देत नाही!

होय ना? आणि घरी कशी करता पूजा अर्चा?

तशीच. देवळांत करतात तशीच.

नैवेद्य कशाचा दाखवता?

शाकाहारी स्वयंपाकाचा. कांदा लसूण नसलेला!

म्हणजे दुसऱ्या जीवांना त्रास देऊन त्यांचे हाल करून तुम्ही देवाला पूजत नाही. का?

का म्हणजे काय? दुसऱ्या जीवाला उगाचच्या उगाच त्रास देणं, त्याचे हाल करणं, त्याला दु:ख देणं हे चांगलं नाही आसं आम्हाला वाटतं.

मग असं वाटून त्या दृष्टीनं तुम्ही जे जे काही करता की नाही, त्याला सात्विक श्रद्धा म्हणतात. दुसऱ्या जीवांना फसवून, धाकदपटशा दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून किंवा त्यांना त्रास देऊन, त्यांचे हाल करून त्यामुळे देव खुष होईल अशी कल्पना करून देवाला प्रसन्न करून घेण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याला तामसी श्रद्धा म्हटलं जातं. एकूण काय, एखाद्या बाबतीत ठाम विश्वास असण्याला श्रद्धा म्हणतात. आहार, विहार, विचार, यजन, याजन, पूजन, तप, ही सगळी कर्मं माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धेनं करतो. मुळांत तो हे सगळं स्वतःच्या समाधानासाठी करतो. त्या स्वसमाधानाव्यतिरिक्त माणसानं ते करण्याचे उद्देश वेगवेगळे असतात.

एक म्हणजे कुणाचंही अहित न होता किंवा कुणावरही अन्याय न होता, त्या कर्मायोगे सगळ्यांचं भलं व्हावं. ह्याला सात्विक प्रकार म्हणतात.

दुसरा उद्देश असा असू शकतो की मुद्दाम कुणाचं अहित न करता अथवा कुणावर अन्याय न करता आपलं काम व्यवस्थित व्हावं.  पण ते करताना जर कुणाचं अहित झालं अथवा कुणावर अन्याय झाला तर त्याला त्याची पर्वा नसते! आपलं ईप्सित प्राप्त झालं तर बास! ह्याला राजस प्रकार म्हणतात.

तिसऱ्या प्रकारांत ते काम करणारा आपलं ईप्सित येनकेनप्रकारेण साध्य करण्यासाठी दुसऱ्याचं अहित करून त्याच्यावर अन्याय करायलाच टपलेला असतो! त्याला तामस प्रकार म्हणतात! लक्षांत येतंय का तुझ्या मी काय म्हणतोय ते?

हो. जरा जरा लक्षांत यायला लागलंय! श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास. सत्व म्हणजे चांगलं. आणि चांगलं म्हणजे अहितविरहित आणि अन्यायविरहित जे आहे ते!

अरे व्वा! अगदी बरोब्बर लक्षांत राहिलंय तुझ्या. झालं. मूळ गाभा कळला ! आता आणखी कळायचं विशेष काही बाकी राहिलेलं दिसत नाही!

नाही कसं? आत्मधन का काय जे म्हणलास ते कुठं कळलंय अजून? ते ही सांग जरा. बघुया कळतंय का?

(बघुया तुला सांगायला कळतंय का, असं तो म्हणतोय असं क्षणभर वाटलं मला!)

अरे ते फारच थोड्यांना कळतं. ज्यांना ते कळतं त्यांना ते वळतंच असं नाही! पण श्री ज्ञानेश्वरमाऊलींनी म्हटलंय - "पारियाचा रवा घेतां भूमीवरी। यत्न परोपरी साधन तैसे।। ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण। दिधले संपूर्ण माझे हाती।।"

म्हणजे काय?

म्हणजे आपला पारा असतो ना, थर्मामीटरमधला....

हां म्हणजे मर्क्युरी ...

..हो. हो. तो चुकून जमिनीवर सांडला, तर काय होतं?

काय होतं?? त्याचे बारीक कण होतात रव्यासारखे आणि पसरतात सगळीकडे!

ते उचलून घेऊन एकत्र करता येतात का?

छे:! आजिबात नाही! काहीही केलं तरी ते हाती येत नाहीत!

तुला कसं माहीत?

कसं माहीत? अरे आमच्या घरांत एकदा थर्मामीटर फुटला होता अनवधानानं. तेव्हा त्यांतला मर्क्युरी रव्यासारखे बारीक कण होऊन पसरला जमिनीवर सगळीकडे! तो परत आमच्या हाती लागला नाही!

होय ना? श्री ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत्. जसे जमिनीवर सांडलेले पाऱ्याचे कण हाती घ्यायला कठीण असतात, तसंच आत्मधन समजायला अत्यंत कठीण आहे!

अरे बाप रे ! मग, कसं कळायचं ते?

माऊली म्हणतात की अप्राप्य असं ते आत्मधन माझे गुरु श्री निवृत्तिनाथ यांनी संपूर्ण माझ्या हातांत आणून दिलं ! म्हणजे जर तुम्ही तुमच्या सद्गुरूंना प्रसन्न करून घेतलंत तर ते तुमच्या ओंजळीत आत्मधन ही दैवी संपत्ती टाकू शकतात!