भाजपची व्होटबँक खेचण्याचा ममतांचा प्रयत्न

पश्चिम बंगाल

Story: राज्यरंग । प्रदीप जोशी |
17th September 2020, 05:47 pm
भाजपची व्होटबँक खेचण्याचा ममतांचा प्रयत्न

मंदिरातील पुजार्‍यांना प्रतिमहिना १ हजार रुपये दिले जातील. या योजनेचा लाभ ८ हजार पुजार्‍यांना मिळणार आहे. याशिवाय स्वतःचे घर नसलेल्या पुजार्‍यांना ‘बंगाल आवास योजने’मध्ये सहभागी करून घेतले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. तृणमूल सरकारकडून मुसलमानांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप होत आहे. या प्रतिमेला छेद देण्यासाठीच ममतांनी हा निर्णय घेतला, असे तज्ज्ञांचे मत आहे.

एम.ए. बी.एड्. एलएलबी असलेल्या ममतांनी १९७० मध्ये युवक काँग्रेसच्या ’छात्र परिषदे’मधून राजकारणात पाऊल टाकले. १९८४ मध्ये वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्यांनी सोमनाथ चॅटर्जी यांच्यासारख्या दिग्गजाला आस्मान दाखवले. १९९१ पासून सलग पाच निवडणुकांत त्या दक्षिण कोलकातामधून वाढत्या फरकाने विजयी झाल्या आहेत. नरसिंह राव सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. मतभेद झाल्यामुळे त्यांनी १९९३ मध्ये मंत्रिपद सोडले. नंतर चार वर्षांनी त्यांनी काँग्रेस सोडली. १९९८ मध्ये त्यांनी ’तृणमूल काँग्रेस’ स्थापन केला. २००१ पर्यंत त्या रालोआ सरकारमध्ये होत्या. २००१ च्या विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. २०११च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माकपची ३४ वर्षांची राजवट संपुष्टात आणली. सलग दोन वेळा त्यांनी सरकार बनवले. 

अलिकडच्या काळात राज्यात भाजप नेत्यांचे संशयास्पद मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. हुगळी जिल्ह्यात रविवारी गणेश राय यांचा, २८ जुलैला पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील हल्दिया येथील बूथ अध्यक्षांचा, त्यापूर्वी हेमताबादचे आमदार देवेन्द्र नाथ रे यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ झाडाला लटकलेल्या स्थितीत मिळाला होता. भाजपने या हत्यांमागे तृणमूल काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. तृणमूलने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. डाव्यांचे अस्तित्व संपवून अनभिषिक्त सम्राट बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या ममतांना केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भाजपची भीती वाटू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. राज्यात सत्ता स्थापण्याचे अमित शहा यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. पक्षाकडे सर्वमान्य स्थानिक नेता नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवरच निवडणूक जिंकावी लागणार आहे. मेघालय आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी ७५व्या वर्षी पुन्हा पक्षाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. ते दूर करण्यासाठी केंद्रीय नेत्यांना लक्ष घालावे लागत आहे.

भाजपशी दोन हात करायचे तर भाजपविरोधी मतांत फूट पडू नये यासाठी ममता काळजी घेत आहेत. माकप आणि काँग्रेस यांची युती होऊन तिसरी आघाडी स्थापन झाली तर भाजपला तोंड देणे कठीण जाणार आहे, हे लक्षात घेऊनच ममतांनी काँग्रेसशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या विरोधकांच्या बैठकीला ममतांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यापूर्वीच्या बैठका तृणमूलने टाळल्या होत्या. पुढील वर्षी २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. ममता आणि भाजप यांच्यात कोण वरचढ ठरतो, याकडे देशाचे लक्ष रहाणार आहे.