‘सर्वसामान्यांसाठी आवश्यक तेवढ्या खाटा उपलब्ध करू !’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही


15th September 2020, 08:05 pm
‘सर्वसामान्यांसाठी आवश्यक तेवढ्या खाटा उपलब्ध करू !’


प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : खासगी इस्पितळांचे दर तेथील डॉक्टर, आरोग्य खाते तसेच गोमेकॉ प्रशासन यांच्याशी चर्चा करूनच निश्चित करण्यात आले आहेत. पण सर्वसामान्य करोनाबाधितांसाठी आवश्यक तेवढ्या खाटा सरकारी इस्पितळांत उपलब्ध केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

खासगी इस्पितळांना करोनावर उपचार करण्यासाठी विशेष डॉक्टर, परिचारिका तसेच तंत्रज्ञांची नेमणूक करावी लागत आहे. त्यांना वेळोवेळी कर्मचारी बदलावे लागत आहेत. त्यामुळे तेथील डॉक्टर, आरोग्य खाते व गोमेकॉ प्रशासनाशी चर्चा करूनच तेथील उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. इतर सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी इस्पितळांत आवश्यक तितक्या खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. गरज भासेल त्याप्रमाणे इस्पितळे ताब्यात घेऊन तेथे करोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यातील काही खासगी इस्पितळांत करोनाबाधितांवर उपचार होत आहेत. पण तेथील खर्च लाखोंच्या घरात आहे. कमीतकमी ३ ते ४ लाख तसेच ट्विन शेअरिंग, खासगी रूम व आयसीयूमधील रुग्णांना उपचारांसाठी पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. ‘गोवन वार्ता’ने मंगळवारी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभर खळबळ माजली होती. राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेची काळजी नाही. त्यामुळेच त्यांनी खासगी इस्पितळांच्या वाढीव दरांना मान्यता दिल्याचा आरोप जनता तसेच विरोधकांकडून होत आहे. 

हेही वाचा