संसदेचे अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात

सरकारला घेरण्याची संधी गमावल्याने काँग्रेस नेते नाराज


14th September 2020, 07:36 pm

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन करोनामुळे बरेच लांबले. मात्र, सोमवारपासून संसदेचे पावसाळी सत्र सुरू झाले आहे. नेमक्या त्याच मुहूर्तावर राहुल गांधी परदेशात गेले आहेत. करोनाची साथ त्यात बिहार निवडणुकांचे पडघम वाजत असताना केंद्र सरकारला घेरण्याची नामी संधी वाया घालवल्याने काँग्रेसचे काही नेते राहुल यांच्यावर नाराज झाले आहेत.
राहुल गांधी यांच्यावर नेहमी आरोप केला जातो की, ऐन गरजेच्या वेळी ते गायब होतात. ज्यावेळी सरकारविरोधात भूमिका घेऊन नेतृत्व करण्याची संधी असते त्यावेळी नेमके राहुल कुठेच दिसत नाहीत. सीएएच्या विरोधातल्या आंदोलनावेळी किंवा दिल्लीत दंगली झाल्या त्यावेळीही हेच दिसले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली. त्यांचे नेतृत्व सरकारला घेरण्यात कमी पडले, असे नेहमी म्हटले जाते. आता एवढ्या दिवसांनंतर होणाऱ्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातही राहुल अनुपस्थित आहेत.‍ नेमक्या याच वेळी परदेश दौऱ्यावर जाऊन त्यांनी ही संधी गमावल्याचे काही काँग्रेस नेत्यांना वाटते.
बिहार निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपला घेरण्याच्या आणि एकटे पाडण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांची मोट बांधण्याची संधी अधिवेशनाच्या माध्यमातून मिळू शकते आणि ऐन मोक्याच्या क्षणी माजी पक्षाध्यक्षांची अनुपस्थिती काँग्रेसला नक्कीच बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते, असे काही नेत्यांचे मत आहे.
काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांच्या ‘लेटर बाँब’ने पक्ष कार्यपद्धतीला सुरुंग लावल्याची घटना अजून ताजी आहे. त्यातच आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राहुल यांची अनुपस्थिती आणखी उठून दिसणारी आहे. काही ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रावरून पक्षांतर्गत गदारोळ उठल्यानंतर आता कुणी उघडपणे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याबद्दल बोलत नाही. पण, काही नेते नाखूश असल्याची चर्चा खासगीत सुरू असते.