लष्कर भरती - 3

करियरनामा

Story: प्रा. रामदास केळकर |
04th September 2020, 11:14 am



वायुसेनेची  माहिती आपण मागच्या  लेखात  घेतली  आहे. यावेळी या शाखेच्या संधीबद्दल  अधिक  माहिती घेऊया. ही शाखा  सर्वात  तरुण,  पण आकाराने  दुसऱ्या क्रमांकाची आहे. 

आणि जगात पाचव्या  क्रमांकावर  आहे. ही आधुनिक  आणि शक्तिशाली शाखा असून     अत्याधुनिक व  शक्तिशाली  लढाऊ  विमाने,  महासंहारक शस्त्रास्त्रे  हे त्याचे  वैशिष्ट्य होय. फ्रान्समधील  राफेल  विमाने हे  त्याचे अलीकडचे  उदाहरण. अत्यंत कुशल, कर्तव्यदक्ष व उच्च मनोबल असलेले  मनुष्यबळामुळे  आपले  वायुदल  सामर्थ्यवान बनले  आहे. अशा  शाखेत  भरती  व्हायची  संधी मिळणे ही अभिमानास्पद  गोष्ट. याचे मुख्य कार्यालय दिल्लीला असून  मुंबई व बंगळुरू  येथेही  केंद्रे  आहेत. मुख्यालय आणि  देशभर  चौदा  वायुसैनिक  निवड  केंद्रे  आहेत. यात अंबाला, कानपुर, जोधपूर, चेन्नई, पाटणा,  भुवनेश्वर, कोचीन  आदींचा समावेश  आहे. 

या क्षेत्रात  येऊ  इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एक  लक्षात  घेतले पाहिजे की अन्य  नागरी  आयुष्यापेक्षा  हे  क्षेत्र  नियमबद्ध  आणि शिस्तप्रधान  आहे. इथे  स्वखुशीने शिस्त  स्वीकारण्याची  तयारी  हवी. साधा  गणवेश  जरी धरला तरी  तिथेही  नियम  आहेत. सैन्य आरमार  आणि  वायुदलाच्या  शाखांमध्ये  वर्षातून दोनदा राष्ट्रीय  संरक्षण  प्रबोधिनी प्रवेश  परीक्षेद्वारे उमेदवाराची  भरती  केली  जाते. त्याचीही  माहिती  तुम्ही एनडीएच्या संकेतस्थळावरून  घेऊ  शकता. वायुदलातील वैमानिकपदासाठी  वैमानिक  बुध्यांक  चाचणी द्यावी  लागते. सर्वसाधारणपणे अर्जाची छाननी  झाल्यांनतर लेखी  परीक्षा द्यावी लागते. यात इंग्रजी आणि  बौद्धिक चाचण्या  सामान्यज्ञान याचे  पेपर  द्यावे लागतात. वस्तुनिष्ठ  प्रकारचे प्रश्न  असतात. नंतर  वैद्यकीय तपासणीसाठी  बोलावले  जाते. विशेष म्हणजे सर्व सूचना दिलेल्या  असतात,  त्या काटेकोरपणे  पाळाव्यात. निवड  झाल्यानंतर कुठेही काम करावे  लागते  व हे सर्व  नियमानुसार होत असते. तुम्हाला  एनसीसीचा  अनुभव  असेल  तर खास  एंट्री  योजनाही  असते. वायुसेनेतील  भरतीची जाहिरातप्रमुख  राष्ट्रीय वृत्तपत्रात, रोजगार  समाचारमध्ये  प्रसिद्ध  होते. त्यानुसार अर्ज  मागविलेले जातात. अर्जाची छाननी  करून  कॉललेटर  पाठविले  जाते. त्यानंतर  लेखी,  तोंडी परीक्षा  घेतली  जाते. वैद्यकीय  तपासणी  हे  सर्व दलांचे  वैशिष्ट्य  म्हणावे  लागेल. मगगुणवत्तायादी  तयार  केली  जाते. सूचनेनुसार  अर्ज नसेल तर  त्याचा विचार केला जात नाही. अलीकडे  महिलांनादेखील  संधी  मिळू लागली आहे. 

वायुसेनेबद्ल महत्वाच्या गोष्टी  आपल्याला  माहिती  असायला हव्यात. स्थापना 8 आॅक्टोबर 1932. म्हणून ८ ऑक्टोबर  हा वायुसेना  दिवस  म्हणून पाळला  जातो.  पूर्वीची राॅयल इंडियन एअरफोर्स, दुसऱ्या महायुद्धात महत्वाची  कामगिरी केली होती .भारताचे पहिले प्रमुख म्हणून सुब्रोतो मुखर्जी यांची नियुक्ती झाली होती. आताचे वायुसेनाध्यक्ष आहेत एअर चीफ मार्शल राकेशकुमारसिंह भदौरिया. नभ:स्पुर्श  दीप्तम या गीतेतील श्लोकाची  सुरुवात त्याचे ब्रीदवाक्य आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी हे वाक्य सुचविले होते. 

पायलट अधिकारी, फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनन्ट, स्क्वॉन्ड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमांडर, एअर मार्शल अशी विविध पदे या शाखेत आहेत. अर्थात  ही माहिती  हिमनगाचे  टोक  म्हणता  येईल अशी. संकेतस्थळावर यावरचे  साहित्य  उपलब्ध असल्याने ते  जरूर वाचावे. भारतीय  वायुसेनेविषयी   विकिपीडियामध्ये  माहिती  आहे.  शिवाय www.indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.