Goan Varta News Ad

हळवा कोपरा

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
14th September 2019, 11:34 Hrs


-
आपल्या मनात जसा एक हळवा कोपरा असतो, ज्यात आपण बरच काही आठवलेलं साठवलेलं असतं तसाच आपला आपल्या घरात सुद्धा एखादा हळवा कोपरा आपण आपल्याही नकळत निर्माण केलेला असतो ,जिथे आपल्या मनाला एक सुख, शांती किंवा ‘सुकून’ प्राप्त झाल्यासारखं वाटतं. कधीकधी हे आपल्याला कळतसुद्धा नाही की कधी आपण त्या जागी जाऊन स्थिरावलो ते. तो आपल्यासाठी आपणच तयार केलेला एक ‘कम्फर्ट झोन’ असतो. तसा आम्हा बायकांचा जीव गुंतलेला असतो, घरातल्या सगळ्या पसार्‍यात पण तरीही त्या पसार्‍यातून तिने आपली अशी खास जागा बनवून घेतलेली असते.
कुणाला बाहेरच्या ओसरीवर बसायला आवडत असेल तर कुणाला अंगणातल्या गारवा देणार्‍या वेलीखाली, झाडाखाली बसायला आवडेल. कुणाला स्वयंपाक घरातली एखादी जागा किंवा कोपराच आवडीचा असेल. ते तिला मूकपणे सोबत करत असतात तिच्या सुखदु:खाचे ते साक्षीदारही असतात आणि वाटेकरीही असतात. कारण तिने त्या क्षणांची उजळणी त्या आवडत्या जागी तर केलेली असते. स्त्री नोकरी करणारी असो की गृहिणी तिचं अस्तित्व घराशीच घोटाळत असतं. तिचं घरातल्या प्रत्येक गोष्टीशी एक नातं जुळलेलं असतं. त्याच्या मागे काही आठवणींचा दुवा जोडलेला असतो. हा ग्लास माझ्या मावशीने दिला, ही घागर आत्याने दिली आणि त्यावेळची आठवणही त्यामागे लपलेली असते. मग माहेरची एखादी खास अशी जागा, जिथे तिला मोकळं मोकळं वाटायचं, ती स्पेशल जागा भलेही छोटीशी असेल ‘एक कोपरा’, एवढंच त्याचं अस्तित्व असेल, पण तिच्यासाठी ती महत्त्वाची असायची.
कधी आपल्या प्रियकराच्या पत्राची उजळणी करताना कुणी पाहू नये म्हणून तिने ते अभ्यासाच्या पुस्तकात ठेवून अनेकदा पुन्हा पुन्हा वाचले असेल. ते तो हळवा कोपरा पहात होताच, त्यावेळी आणि आताही सासरी कुणीतरी काही बोलून तिचं दुखवलेलं मन, अन् त्यावेळी तिने चोरून ढाळलेले अश्रू तो हळवा कोपराच पहात असतो. त्या कोपर्‍याने तिची किती तरी गुपिते आपल्यापाशी ठेवून घेतली असतील. मायेने पोटात घातली असतील. त्या जागी ती कधी चिंतन, मनन करत असेल कधी तिला एखादी कविता स्फुरली असेल, आवडत्या लेखकाचं पुस्तक हातात घेऊन ती त्याच्याशी समरस झाली असेल, कधी एकटी असताना ती आपल्याच मनाशी स्वप्न रंजनात गुंगली असेल.
माझ्या मैत्रिणीच्या सासूबाईंना लोकरीच्या विणकामाची आवड. त्या कधीही पाहिलं की त्यांच्या आवडत्या आरामखुर्चीत बसून एकसारख्या विणकाम करत बसलेल्या असायच्या. मग त्यावेळी एकीकडे हाताने विणकाम तर दुसरीकडे टीव्ही बघणं, आलेल्यांशी गप्पा मारणं, सुनेला सूचना करणं हेही चालू असायचं. त्या गेल्यावर मात्र त्यांचा तो आवडता कोपरा रिकामा झाला होता. ती खुर्चीही तिथून हलवली होती. आमच्या शेजारच्या घरात रहाणारी सहा- सात वर्षांची मुलगी तिला कुणी रागावलं की दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत बाल्कनीत जाऊन बसे. मग तिची आई तिची समजून काढत तिला घरात घेऊन येई. माझ्या एका मैत्रिणीकडे मोठा झोपाळा आहे. तिची ती फेव्हरेट जागा. तिथे ती घरात कुठे सापडली नाही की तिथे बसलीय हे नक्की. शेजारच्या आजींना देवघराचा कोपरा आवडतो. ती त्यांची आवडती जागा. मनाला शांत करणारी, आपले प्रश्न, आपले प्रॉब्लेम त्या बहुतेक देवाशी शेअर करत असाव्यात. बाहेरच्या गोंगाटापासून जरा अलिप्त स्वत:तच दंग असण्याचा सुकून तिथे मिळतो. चहाचा वाफाळता कप हातात घेऊन तिची तंद्री लागते अशी ती जागा म्हणजे तिचं हळवा कोपरा.
दिवसभरातली सारी मरगळ सारा थकवा तिथं थोडा वेळ बसल्याने दूर करता येतो, त्यामुळे जी मन:शांता मिळते ती स्फूर्ता देणारी असते, तिला ती स्वत: भेटत असते. ती भेट महत्त्वाची, तिला तिच्याशीच संवाद साधता येतो अशी ही जागा. म्हणून तिच्या साठी मह्त्त्वाची असते. तिला मिळालेली ती स्पेस तिने जपली पाहिजे. तिला तिच्या मनासारखा आनंद तिथे उपभोगता आला पाहिजे. तो कोपरा वेळी अवेळी तिला आधार देतो, मदतीचा हात पुढे करतो मनाला बळकटी देतो तिला संसाराच्या अवघड वाटा वळणावर मार्ग दाखवतो, दमल्या भागल्या जीवाला चार क्षण विसाव्याचे मिळवून देतो, असा हा हळवा कोपरा प्रत्येकीकडे असावा. असल्यास तिने तो जपावा, नसल्यास तो निर्माण करावा. कारण तो तिच्यासाठी कम्फर्ट झोन असतो. हसण्या- फुलण्याचे तिला बळ देत असतो.
(लेखिका गृहिणी, साहित्यिक आहेत.)