राष्ट्रीय पक्षांमुळे गोव्याचे नुकसान : दीपक ढवळीकर

समर्थकांची संख्या लक्षणीय आहे, तेथे पक्ष कार्यालय स्थापन केले जाईल.


18th March 2018, 02:36 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

फोंडा : गोव्यात सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रीय पक्षांनी राज्याचे मोठे नुकसान केले आहे. गोमंतकीयांना त्याची किंमत मोजावी लागत आहे, अशी टीका मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली.

मगो पक्षाच्या फोंडा येथील कार्यालयाची माहिती देण्यासाठी शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. गोव्यात प्रादेशिक पक्षांची विशेषकरून मगो पक्षाची का व कशी गरज आहे, हे लोकांना आम्ही पटवून देणार आहोत, असेही ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.      अलीकडेच मगो पक्षात प्रवेश केलेले डॉ. केतन भाटीकर, फोंडा पालिकेचे नगरसेवक गीताली  तळावळीकर, निधी मामलेकर यावेळी उपस्थित होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी हातमिळवणी केली, ही आमची चूक होती हे आम्ही जाहीरपणे मान्य केले आहे. यापुढे अशी चूक आम्ही करणार नाही. लोकांमध्ये जाऊन प्रादेशिक पक्षाची कशी गरज आहे, हे त्यांना पटवून देणार आहोत. राष्ट्रीय पक्षांनी गोव्याचे नुकसान केले, असे सांगताना ढवळीकर यांनी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचे नाव मात्र घेतले नाही. या आधीच्या निवडणुकात मगो पक्षाने काँग्रेस व भाजपशी निवडणूकपूर्व युती केली होती. सध्याच्या राज्यातील भाजप नेतृत्वाखालील युतीच्या सरकारात मगो हा एक घटक पक्ष आहे.            

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी असलेले संबंध तोडून टाकल्यानंतर आम्हाला आमची शक्ती तसेच मर्यादा दिसून आल्या. भाजपशी युती न केल्यामुळे आम्हाला काही जागा गमवाव्या लागल्या तरी आमची मतदान टक्केवारी २००७ च्या निवडणुकीत वाढली होती. ती ७ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर पोहोचली. आमच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट आहे. ज्या मतदारसंघात आमच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे, तेथे पक्ष कार्यालय स्थापन केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.            

तिस्क-फोंडा येथील मगो पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याला सकाळी ११.३० वाजता होणार आहे. पक्षनेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, माजी आमदार लवू मामलेदार  व पक्ष समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहाणार आहेत, असेही दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा