६.३० कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला दोडामार्गमध्ये अटक

कॅसिनोतून पसार झाल्यानंतर फार्महाऊसमध्ये बसला होता दडून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th April, 12:04 am
६.३० कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला दोडामार्गमध्ये अटक

पणजी : इन्फोसीस कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून बंगळुरु येथील एका कंपनीला कॉर्पोरेट सोशल रीस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६.३० कोटीचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित गगन एन. दीप (३२, कर्नाटक) हा गोव्यात कॅसिनोत चौकशीसाठी आणल्यावेळी फरार झाला होता. त्याला पणजी किनारी पोलिसांनी दोडामार्ग येथील एका फार्महाऊसवरून अटक केली.

गगन एन. दीप याने म्हैसूर मर्कंटाइल कंपनीला संपर्क साधून तो इन्फोसिस लिमिटेडचा प्रादेशिक प्रमुख (सीएसआर) असल्याचे भासवले. तसेच इन्फोसिसचे वरिष्ठ अधिकारी हर्ष जे. आणि निलाद्री प्रसाद मिश्रा यांच्या हाताखाली काम करत असल्याचेही सांगितले. म्हैसूर मर्कंटाइल कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘हेग्गुंजे राजीव शेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या उपक्रमांमध्ये स्वारस्य दाखवले आणि इन्फोसिसकडून सीएसआर निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, संशयिताने ट्रस्टला सीएसआर अनुदानाच्या मंजुरीसाठी पूर्वअट म्हणून, इन्फोसिसचे कथित अधिकृत विक्रेते असलेल्या संस्थांकडे ‘अग्रिम रक्कम’ म्हणून सुमारे ६.३० कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयिताने २१ ऑक्टोबर २०२५ रोजी इन्फोसिस कंपनीचे निलाद्री प्रसाद मिश्रा यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे बनावट मंजुरी पत्र जारी केले. तसेच दोन अनुदान करार करण्यात आले.

फसवणूक झाल्याचे समजताच ट्रस्टने देवनाहल्ली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तेथील पोलिसांनी ३१ मार्च रोजी गगन एन. दीप याला हणजूण येथील एका रिसोर्टमधून अटक केली. याच दरम्यान त्याने गोव्यात कॅसिनोमध्ये पैसे उडविल्याचा जबाब दिला. त्यानुसार, चौकशी करण्यासाठी त्याला ३ एप्रिल रोजी गोव्यात आणले होते. याच दरम्यान ४ रोजी कॅसिनोतून गर्दीचा फायदा घेत तो फरार झाला. या संदर्भात पणजी किनारी पोलिसात तक्रार नोंद केली. संशयित दोडामार्ग परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, किनारी पोलीस अधीक्षक राॅय पेरेरा आणि राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक उपनिरीक्षक कार्लोस पोंटेस, हवालदार सूर्यकांत बार्डेकर, कॉ. लक्ष्मण कवठणकर, राजेश मार्दोळकर या पथकाने गगन एन. दीप याला अटक केली.

घरे, आरोग्य केंद्रे उभारण्याची थाप

सीएसआर अंतर्गत संपूर्ण कर्नाटकभर १७९ कोटी रुपये खर्चाची ८५५ हून अधिक घरे बांधण्याच्या नियोजनाचा ८ जानेवारी २०२६ रोजी करार करण्यात आला. तर दुसरा करार १३ जानेवारी २०२६ रोजी केला. त्यात १७८ कोटी रुपये खर्चाची प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित होते. त्यानंतर या संदर्भात पुढे काहीच हालचाल होत नसल्यामुळे ट्रस्टने इन्फोसिस कंपनीला संपर्क केला. त्यावेळी गगन एन. दीप याने ट्रस्टला ६.३० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले.

हेही वाचा