पर्यटक दाम्पत्य, कर्मचाऱ्याला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

म्हापसा : गोव्यातील (Goa) तिवायवाडा, कळंगुट (Calangute) येथील ‘स्प्रिंग कॉटेज’ या ‘गेस्ट हाऊस’ला अज्ञात व्यक्तीने आग (Fire) लावल्याने दोन कॉटेजिससह एक स्टोअर रूम जळून भस्मसात झाला. एक पर्यटक (Tourist) दाम्पत्य आणि एका कर्मचाऱ्याला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
ही दुर्घटना आज बुधवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास घडली. यात सुमारे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. आगुस्तीन लोबो यांच्या मालकीचे हे आठ कॉटेजचे गेस्ट हाऊस असून; पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून त्या बनवल्या आहेत.
यातील दोन कॉटेज आणि गोदामाच्या खोलीला अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावली. या पेट्रोलचे काही अंश कॉटेजच्या दरवाजावर आढळून आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत फोम व पाण्याचा फवारा मारून ही आग नियंत्रणात आणली. त्यामुळे इतर सहा कॉटेजिसना आग लागली नाही.
त्यापूर्वी आगीमुळे कॉटेजमध्ये अडकलेले एक मैसूर येथील पर्यटक दाम्पत्य तसेच गोदामाच्या खोलीतील कामगाराला दलाच्या जवानांनी वेळीच बाहेर काढले व त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.
ही आग कुणीतरी जाणूनबुजून लावली आहे. कॉटेजच्या प्रवेशद्वारावरील कार्पेटवर पेट्रोल किंवा इतर काहीतरी द्रव्य ओतले आणि आग लावली. माझे कुणीही शत्रू नाहीत. परंतु पूर्वीच्या भाडेकरूनेच ही आग लावल्याचा संशय मालक आगुस्तीन लोबो यांनी व्यक्त केला आहे.
पिळर्ण अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र शेट्ये, प्रदीप नाईक, दिनेश गावडे, प्रितेश महालदार, स्वप्नील नाईक, मनोज महाले, साईराज मांद्रेकर यांच्यासह म्हापसा स्टेशनच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली. कळंगुट पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.