पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची सूचना : नंबरप्लेट काढणाऱ्यांवर मडगाव पोलिसांचा दणका

मडगाव : मडगाव पोलिसांकडून मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या, नंबरप्लेट नसलेल्या सहा दुचाकीचालकांवर कारवाई करत दुचाकी जप्त केल्या आहेत. पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांनी व्यक्त केले.
मडगाव पोलिसांकडून शहरात नंबरप्लेट लावल्याशिवाय गाडी चालवणार्या तसेच ज्या गाड्यांचे सायलेन्सर बदलून मॉडिफाइड करण्यात आले आहेत, अशा गाड्यांवर कारवाई केली. पोलिसांनी मोहीम राबवत सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली आहे.
वाहतूक पोलीस हेल्मेट न घातल्यास कारवाई करतात व मुलांना हेल्मेट घालायचे नसते. जास्तकरून मागील नंबरप्लेटचा पोलीस फोटो घेत असल्याने कारवाईपासून वाचण्यासाठी मुलांकडून नंबरप्लेटच काढून टाकण्याचे प्रकार घडतात, असेही पोलीस निरीक्षक सामंत यांनी सांगताना प्रत्येक पालकाने परवाना नसल्यास मुलाला गाडी देऊ नये व तो चालवत असलेल्या गाडीच्या नंबरप्लेट असल्याची व सायलेन्सर मॉडिफाइड नसल्याची खात्री करावी, असेही सांगितले.
पोलीस निरीक्षकांचे पालकांना आवाहन
मडगाव पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांनी या कारवाईनंतर पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मडगाव पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित मोहीम राबवत आहेत, तरीही अनेक पालक आपल्या मुलांना परवाना नसताना दुचाकी देत आहेत. काही तरुण सायलेन्सर बदलून मॉडिफाइड करतात किंवा पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मागील नंबरप्लेटच काढून टाकतात. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिल्यास हे प्रकार कमी होऊ शकतात, अन्यथा काही चुकीचे घडल्यास पालकांचीच चूक असेल.