राज्यातून चार महिन्यांत २,८०० टन कृषी उत्पन्नांची निर्यात

एपिडाच्या आकडेवारीवरून स्पष्ट


05th October, 12:13 am
राज्यातून चार महिन्यांत २,८०० टन कृषी उत्पन्नांची निर्यात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील चारच महिन्यांत गोव्यातून २,८०० मेट्रिक टन कृषी उत्पन्नाची विदेशांत निर्यात झाली. या उत्पन्नाच्या विक्रीतून सुमारे ५० कोटीहून अधिक रक्कम प्राप्त झाली, अशी माहिती कृषी आणि प्रसंस्कृत खाण उत्पन्न निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) दिली आहे.
एपीडाने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाचे आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये भाजी, फळे, काजू, फेणी आदी कृषी उत्पन्न २,८३९ मेट्रिक टन विदेशांमध्ये निर्यात करण्यात आले. गोव्यातून निर्यात झालेल्या या कृषी उत्पन्नाची किंमत ५.९९ अमेरिकन मिलियन डॉलर म्हणजेच ५१.३० कोटी इतके आहे. फक्त रेल्वे आणि हवाई मार्गाद्वारे या उत्पन्नाची निर्यात करण्यात आली.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ६७७ मेट्रिक टन उत्पन्नाची निर्यात होऊन १३.१४ कोटी इतकी किंमत मिळाली. मे महिन्यात निर्यातीत वाढ होऊन एकूण निर्यात १,३६९ टन झाली. आणि दोन महिन्यांची किंमत २७ कोटींपर्यंत पोहोचली. जूनमध्ये एकूण निर्यात २,०२५ टनांपर्यंत पोहोचली. किंमत ३८.७३ कोटीपर्यंत मिळाली. जुलैमध्ये एकूण चार महिन्यांची निर्यात २८,३१९ मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आणि एकूण किंमत ५१.३० कोटींपर्यंत मिळाली.
बहुतेक निर्यात रेल्वेमार्गे
बहुतेक कृषी उत्पन्नाची निर्यात रेल्वेमार्गे होते. बाळ्ळी रेल्वे स्टेशनच्या रेल्वे लॉजिस्टिक पार्कमधून २,१५९ मेट्रिक टन उत्पन्नांची निर्यात होऊन ३४.५९ कोटी किंमत मिळाली. दाबोळी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवरून ६९.८६ मेट्रिक टन उत्पन्नाची निर्यात होऊन १.५९ कोटी किंमत मिळाली. मोपा विमानतळाच्या कार्गो टर्मिनलावरून ६०९ मेट्रिक टन उत्पन्नाची निर्यात होऊन १५.११ कोटी किंमत मिळाली.

हेही वाचा