प्रशासन स्तंभ, युनिटी मॉलसह एकूण २,४५१ प्रकल्पांची पायाभरणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कोमुनिदाद, सरकारी आणि खासगी जमनीतील अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठीच्या ‘माझे घर’ योजनेचा शुभारंंभ शनिवारी केंंद्रीय गृहमंंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. ताळगावच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या सोहळ्याला मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत, अन्य मंंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रशासन स्तंंभ, युनिटी मॉल, छ. शिवाजी महाराज म्युझियम अशा एकूण २,४५१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची व्हर्च्युअल पद्धतीने पायाभरणी होणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोकांना येण्यासाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली आहे. केंंद्रीय गृहमंंत्री अमित शहांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेतील बदल वाहतूक पोलिसांनी जारी केले आहेत.
पावसाळी अधिवेशनात सरकारने तीन विधेयके संंमत केली होती. कोमुनिदाद जमिनीतील अनधिकृत घरे/बांंधकामे अधिकृत करण्याची तरतूद असलेले ‘लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा’ दुरुस्ती विधेयक संंमत झाले. सरकारी जमिनीतील घरे/बांंधकामे अधिकृत करण्यासाठी ‘लँड रिव्हेन्यू कोड’ दुरुस्ती विधेयक संंमत झाले. तसेच खासगी जमिनीतील घरे/बांंधकामे अधिकृत करण्यासाठी अनधिकृत बांंधकामे अधिकृत (रूका) करणारे विधेयक संंमत झाले. राज्यपालांच्या मान्यतेनंतर तिनही विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू होईल. घरे अधिकृत करण्यासाठीच्या अर्जांचे वाटप शनिवारपासून सुरू होईल. केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काही जणांना अर्जांचे वाटप केले जाईल. अर्जाचे नमुने, जमिनीचे दर, नियम तसेच प्रक्रियेची अधिसूचना जारी झाली आहे.
विविध प्रकल्पांची होणार पायाभरणी
जुन्ता हाऊस इमारत प्रकल्प, प्रशासन स्तंंभ इमारत, युनिटी मॉल, टाऊन स्क्वेअर, छ. शिवाजी महाराज किल्ल्याचे सुशोभीकरण, हरवळे धबधबा सुशोभीकरण आदी प्रकल्पांची व्हर्च्युअल पद्धतीने पायाभरणी होणार आहे. दंत महाविद्यालयाची नवी इमारत, डी. बी. बांंदोडकर स्टेडियम, ई विटनेस रूम यांचा शुभारंभ होईल. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन होईल.