टॅक्सी चालकांची हत्या करून गाड्या विकायचा नेपाळमध्ये
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल २४ वर्षांपासून फरार असलेल्या एका सीरियल किलरला अटक केली आहे. अजय लांबा असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर चार हत्यांचे गुन्हे आणि दरोड्याच्या घटना दाखल होत्या. त्याने टॅक्सी चालकांना लक्ष्य करून निर्दयीपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे.
गुन्ह्यांची पद्धत थरकाप उडवणारी!
पोलीस उपायुक्त आदित्य गौतम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजय लांबा आणि त्याचे साथीदार टॅक्सी भाड्याने घेऊन उत्तराखंडकडे जात असत. प्रवासादरम्यान चालकाला गुंगीचं औषध देत, बेशुद्ध केल्यानंतर गळा दाबून हत्या केली जात असे. त्यानंतर मृतदेह डोंगर-दर्यांत फेकून दिला जात असे आणि चालकाची टॅक्सी नेपाळमध्ये तस्करी करून विकली जात असे.
२००१ पासून सुरुवात, २०२५ मध्ये शेवट
या हत्याकांडाची मालिका २००१ साली सुरू झाली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये त्याने एकामागोमाग एक अशा चार हत्यांची कबुली दिली आहे.
त्याच्या टोळीत धीरेंद्र नेगी आणि दिल्लीचा एक साथीदार सहभागी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अजय लांबा कोण आहे?
अजय लांबाने दिल्लीतील शिक्षण सहावीतच सोडले. त्यानंतर उत्तर प्रदेशातील बरेली शहरात तो राहत होता. पोलिसांनी सांगितलं की, अजय लांबावर इतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, आणखी किती हत्यांमध्ये तो सहभागी आहे हे तपासले जात आहे.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
उपायुक्त आदित्य गौतम म्हणाले की, आमच्याकडे अजय लांबा व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध पुरेसे तांत्रिक आणि साक्षी पुरावे उपलब्ध आहेत. त्याने केवळ टॅक्सी चालकांची हत्या केली नाही, तर एक माफक योजनाबद्ध गुन्हेगारी जाळे उभारले होते. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.