डिचोली : गोव्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या दोन परदेशी महिलांना डिचोली पोलिसांनी एका संयुक्त शोध मोहिमेत कारवाई करत अटक केली आहे. या महिला अधिकृत व्हिसा आणि पासपोर्ट शिवाय गोव्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई डिचोली पोलीस आणि पणजी पोलिसांच्या संयुक्त पथकाने अचानक केलेल्या तपास मोहिमेदरम्यान करण्यात आली. अधिक तपास केला असता दोन्ही महिला भारतात प्रवेश करताना वापरलेली अधिकृत कागदपत्रे दाखवू शकली नाहीत. त्यांच्यावर विदेशी नागरिक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.अटकेत आलेल्या महिला झरीना लिनोनिड वोपरी कोवा (वय ३८) ह्या रशियन नागरिक असून अंता नीना सायगेई कार्पेनका (वय ३७) या बेलारूस येथील रहिवासी आहेत.न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक विराज धावस्कर, जयप्रकाश जानकर, वर्षा देसाई, उजिता पराडकर व पराग पारेख यांच्या पथकाने केली. संपूर्ण तपास अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक व्हीलसन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.