‘छोटू दादा, उद्या मी पुन्हा तुझ्यासोबत माळरानात येऊ?’ पृथाने विचारले. छोटू दादाने नकार दिला, "नको गं बाई! तू आलीस की मी खेळत बसतो, मंगूकडे पण लक्ष राहत नाही. माझी शाळा बुडाली परवा तुझ्या नादात, पवार गुरुजी खूप चिडले होते, माहितेय?"
पृथाला हसू आवरले नाही. "शाळा? काहीही थापा मारतोस! उन्हाळ्याच्या सुट्टीत असते वाटतं कुणाला शाळा?" तिने नाक उडवत विचारले.
छोटू दादाने स्पष्ट केले, "थापा नाही काही. मला खरंच शाळा असते. सकाळी अकरा वाजता वर्ग भरतात. त्याआधी मी इथे येतो – मंगूला आंघोळ घालतो, तिला चरायला नेतो आणि मग शाळेत जातो. आमच्या शाळेला कधीच सुट्टी नसते – रविवारीसुद्धा नाही, दिवाळीत नाही, उन्हाळ्यात नाही... कधीच नाही."
"श्शी! कोण जाईल असल्या सुट्टी न देणाऱ्या शाळेत? आम्हाला तर सॅटर्डे-संडे सुट्टी असते, माहितेय?" पृथाने ऐट दाखवली.
"असेल," छोटू दादा नम्रपणे म्हणाला, "पण मला माझी शाळा खूप आवडते. पवार गुरुजी, देव्हरेकर सर, सारंग सर, माझे सगळे वर्गमित्र – सगळे मला खूप खूप आवडतात. आम्ही एकत्र अभ्यास करतो, एकत्र खेळतो, एकत्र स्वयंपाक करतो आणि एकत्रच जेवतो."
पृथाला आणखीनच आश्चर्य वाटले. "काय? तुम्ही शाळेत स्वयंपाक करता? खरा-खरा की भातुकलीतला?"
"अगं, भातुकलीतल्या जेवणाने भूक भागते का? खरी-खरी भूक लागल्यावर खरं-खरं जेवणच लागतं ना!" छोटू दादाने समजावले. "शाळेला स्वयंपाकघर आहे, झोपण्यासाठी पण खोल्या आहेत."
"अच्छा... आता समजलं! तुला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलंय तुझ्या आई-बाबांनी! मला तर खूप भीती वाटते बोर्डिंग स्कूलची. तुला नाही वाटत?" पृथाने विचारले.
"पृथा, मला आई-बाबांनी नाही पाठवलं या शाळेत. कारण... मला आई-बाबा नाहीत. आणि आमच्या शाळेला आम्ही बोर्डिंग स्कूल म्हणत नाही. ‘आश्रमशाळा’ म्हणतो. मला तसंच म्हणायला आवडतं." छोटू दादा गंभीरपणे म्हणाला आणि तिथून निघून गेला.
पृथा गोंधळली. तिला खूप प्रश्न पडले. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त आजीच देते, म्हणून ती आजीकडे गेली. आजी देवाजवळ वाती वळत बसली होती.
"आजी, छोटू दादा म्हणाला की त्याला आई-बाबा नाहीत. असं कसं?"
आजी म्हणाली, "पृथा, त्याचे आई-बाबा देवाघरी गेले. ते चिपळूणचे होते. एकदा शेतात काम करत असताना छोटूच्या बाबांना विषारी साप चावला आणि त्यांचा मृत्यू झाला. मग छोटूची आई एकटी पडली. शेतात राबून आणि लहान छोटूला सांभाळून ती आजारी पडली आणि वर्षभरात तीही देवाघरी गेली. त्यावेळी छोटू पाच-सहा वर्षांचा असेल."
आजीने पुढे सांगितले, "त्याच दरम्यान, तुझे आजोबा, देव्हरेकर आजोबा आणि गावातल्या काही तरुणांनी आपल्या गावात 'आश्रमशाळा' सुरू केली. ही भातशेती मजुरांच्या मुलांसाठी आहे. त्यांना स्वतःची जमीन नसते, ते कामाच्या शोधात भटकत असतात. त्यांची मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. म्हणून या मुलांना शिकता यावं यासाठी राहण्याची, जेवणाखाण्याची सोय असलेल्या या आश्रमशाळा असतात."
"अशी शाळा आपल्या गावात सुरू झाली म्हटल्यावर छोटूचा एक लांबचा चुलता त्याला इथे घेऊन आला. पाच वर्षं झाली त्या गोष्टीला. छोटू आता इथलाच झाला आहे. त्याचं खरं नाव मुकुंद आहे. तो मोठा गुणी आणि कष्टाळू मुलगा आहे. तो बासरी कशी सुरेख वाजवतो पाहिलीस ना? त्याचे बाबा पण वाजवायचे म्हणे बासरी."
"पृथे, छोटूचे सुद्धा आई-बाबा आहेतच की! त्याच्या बासरी वादनात आहेत, त्याच्या कष्टाळू वृत्तीत आहेत. आपले आई-बाबा असतातच. आपल्या जवळ नसले, तरी आपल्यात असतातच!"
पृथाने पटकन डोळे पुसले. तिला सगळंच समजलं नव्हतं, पण छोटू दादाचे आई-बाबा "आहेतच मुळी!" – हे मात्र तिला पक्कं समजलं होतं... आणि त्यामुळे खूप छान वाटत होतं!
डाॅ. गौरी प्रभू
९०८२९०५०४५