राज ठाकरे समर्थकांचा संताप, केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड
वरळीः केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी काल थेट राज ठाकरे यांना आव्हान देत मराठी बोलणार नाही अशी पोस्ट जाहीर केली होती. मात्र, अशाप्रकारे आव्हान देणं हे त्यांना चांगलं महागात पडलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची आज सकाळी तोडफोड केल्याची माहिती हाती आली आहे.
संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगडफेक केली. राज्य सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द केल्यानंतर आयोजित केलेल्या मराठी विजयी मेळाव्याआधीच मनसैनिकांकडून 'खळ्ळखट्याक' करण्यात आले आहे.
या तोडफेडीसंगर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुशील केडिया यांचं ऑफिस नारळ फेकून फोडण्यात आलं आहे. माथाडी कामगार सेनेचे कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडल्याची माहिती, मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली. "आज आम्ही केडियाचं ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही घाबरणार नाही. सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही", असा इशाराही गोळे यांनी दिला.
"मला माझ्या माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, त्यांचं अभिनंदन करतो. केडिया नावाचा भेडिया गेली दोन दिवस गरळ ओकत आहे. राज साहेबांना त्याने आव्हान दिलं होतं. मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला त्याने आव्हान दिलं होतं. मागील ३० वर्ष महाराष्ट्रात पैसे कमावतोय, मात्र त्याला मराठी येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अशा माणसांना मराठीचा अपमान करायचा असेल कर यासाठी ठोस कायदा तयार केला पाहिजे. नाहीतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक अशांना धडा शिकवण्यासाठी तयार आहेतच, असं सचिन गोळे यांनी म्हटलं.
'अशी' होती केडिया यांची पोस्ट
सुशील केडियांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका करण्यात आली असून आपण मराठी शिकणार नाही, अशी भूमिकाच सुशील केडिया यांनी जाहीर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये असं म्हटले आहे की, राज ठाकरे, याची नोंद घ्या की मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचं यासंदर्भातलं बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणा नाही, काय करायचंय बोल”, असं केडियांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अधिवेशनाच्या आधीच अध्यादेश रद्द
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदी-मराठी वाद हा एक केवळ भाषिक नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय मुद्दा बनतोय. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेऊन राज्य सरकारने पहिलीपासून मराठी भाषा शिकण्यासंदर्भात आदेश जारी केला. पण या निर्णयाला सामाजिक व राजकीय वर्तुळातून झालेला विरोध लक्षात घेता महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भातले अध्यादेश रद्द केल्याचं जाहीर केले.