पुळीचा नायटा झाला, 'डॉक्टरांनी' उतारा दिला

गोमेकॉच्या डॉक्टरांचा संप मिटवून मुख्यमंत्री झाले हिरो

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th June, 04:36 pm
पुळीचा नायटा झाला, 'डॉक्टरांनी' उतारा दिला

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद स‍ावंत यांनी आज गोमेकॉत जाऊन हस्तक्षेप केल्यानंतर डॉक्टरांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्य‍ाविरोधात सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. गोमेकॉतील डॉक्टरांनी सरकारकडे केलेल्या सातही मागण्या मान्य केल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकार‍ांशी बोलताना स्पष्ट केले. 

गोमेकॉत बी-१२ इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या रुग्णाशी योग्य वर्तन न केल्याच्या कारणास्तव आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना फैलावर घेत सर्वांसमोर त्यांचा अपमान केला होता. यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर अॉल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफएआयएमए) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) गोवा शाखेनेही आक्रमक पवित्रा धारण केला.


या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ७२ तासांत कारवाई न केल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा या दोन्ही संघटनांनी दिलेला असतानाच, गोमेकॉतील डॉक्टरांनीही सोमवारपासून आंदोलन सुरू केले. मंत्री राणे यांनी ज्या ठिकाणी येऊन डॉ. कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्याच ठिकाणी येऊन त्यांनी डॉ. कुट्टीकर यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर आंदोलक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. डॉक्टरांचे आंदोलन पेटण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज दुपारी गोमेकॉत जाऊन डीन डॉ. बांदेकर आणि इतर वरिष्ठ डॉक्टरांशी बैठक घेतली.


सातही मागण्या पूर्ण करण्याची हमी
डॉक्टरांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी केलेल्या सातही मागण्या पूर्ण करण्याची हमी आपण त्यांना दिली आहे. यापुढे इस्पितळात जाऊन व्हिडिअोग्राफी करण्यास बंदी घातली जाईल, व्हीआयपी संस्कृती बंद केली जाईल, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी गोमेकॉ परिसरात आणखी ५० पोलिसांची नियुक्ती करण्यात येईल, तेथील पोलीस स्थानकात उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात येईल, यापुढे गोमेकॉत असे प्रकार घडू नये यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

प्रत्येक रुग्णाला योग्य, उच्च दर्जाची आरोग्यसेवा
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर, गोमेकॉत उपचारांसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला व्हीआयपी हस्तक्षेपाशिवाय योग्य आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळेल, असे आश्वासन डॉक्टरांनी दिले.

हेही वाचा