भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका येत्या २० जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून सध्या सराव सामना खेळत आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर आता संघात मुख्यतः तरुण खेळाडू आहेत. मात्र या नवख्या संघातही जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी आणि स्टार वेगवान गोलंदाज उपस्थित आहे आणि याच मालिकेत त्याच्याकडे एक मोठा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा ‘सेना’ देशांमध्ये (इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक कसोटी बळी घेणारा आशियाई गोलंदाज आहे. त्याच्या नावावर या देशांमध्ये एकूण १४६ कसोटी बळी आहेत.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने आतापर्यंत ‘सेना’ देशांमध्ये १४५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराहला अक्रमचा विक्रम मोडण्यासाठी फक्त २ बळींची आवश्यकता आहे.
२० जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्याच कसोटीतच बुमराह हा विक्रम मोडेल, असा विश्वास क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. इंग्लंडमधील परिस्थिती आणि त्याच्या स्विंग व यॉर्कर गोलंदाजीमुळे बुमराहसाठी दोन विकेट्स घेणे कठीण नाही.
‘सेना’ देशांत सर्वाधिक बळी घेणाऱ्या आशियाई गोलंदाजांमध्ये वसीम अक्रम (पाकिस्तान) १४६ बळी, जसप्रीत बुमराह (भारत) १४५ बळी, अनिल कुंबळे (भारत) १४१ बळी, ईशांत शर्मा (भारत) १३० बळी, मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) १२५ बळी यांचा समावेश आहे. बुमराहने २०१८ पासून आतापर्यंत (जून २०२५ पर्यंत) ३२ हून अधिक कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने २०५ बळी घेतले आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी सुमारे २३.५५ आहे, तर स्ट्राइक रेट १६.०९ आहे. हे आकडेवारी गोलंदाजी क्षेत्रात त्याच्या वर्चस्वाची साक्ष देते. त्याच्या नावावर १० हून अधिक वेळा ५ किंवा अधिक बळींची कामगिरी आहे.
बुमराहचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे परदेशी खेळपट्यांवर त्याची कामगिरी. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या सर्व ठिकाणी त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. विशेषतः २०२१ साली लॉर्ड्स टेस्टमध्ये त्याच्या अप्रतिम स्पेलमुळे भारताने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियातही २०१८-१९ च्या ऐतिहासिक मालिकेत बुमराहने छाप सोडली होती.
बुमराह हा सध्या भारताचा 'टेस्ट स्पेअरहेड' मानला जातो. त्यामुळे पहिल्याच कसाेटीत तो अक्रमचा विक्रम मोडून आपल्या कारकिर्दीत मानाचा तुरा रोवला जाणार, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
- प्रवीण साठे